दरड कोसळल्याने आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला

ग्रामस्थांवर सात ते आठ किमी पायपीट करण्याची वेळ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाच आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. दरड रस्त्यावर आल्याने या भागातील स्थानिकांची पायवाट बंद झाली आहे. या भागातील आदिवासी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.         

 माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या भुतिवलीवाडी, सागाचीवाडी, चिंचवाडी, बोरीचीवाडी आणि धामणदांडा या आदिवासी वाड्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता पालीभुगविली धरणाच्या वरील बाजूने बनवण्यात आलेला आहे. मात्र, या ठिकाणी या रस्त्यावर दरड कोसळल्याने पूर्णतः बंद झाला आहे. दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र हा मार्ग अत्यंत कठीण असून, वाहनाने भूतिवली गावापर्यंत जाऊन त्यानंतर डोंगररांगातून पायी प्रवास करून आपल्या घरी पोहोचावे लागत आहे. या प्रवासात नागरिकांना सुमारे सात ते आठ किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने विशेषतः पावसाळ्यात त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंची ने-आण, तसेच कामासाठी ये-जा करणे या गोष्टी अत्यंत कठीण बनल्या असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.तर दरड हटवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे. अन्यथा नागरिकांना रोजचा सात ते आठ किलोमीटरचा त्रासदायक प्रवास करावा लागणार असून त्यातून गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version