। मुंबई । प्रतिनिधी ।
भाषा ही वादासाठी नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषांच्या आदान-प्रदानातून संस्कृतीचा विकास होत असतो. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी-हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे त्या दिशेने टाकलेले एक स्तुत्य आणि उत्तम पाऊल आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कौतुकाची भावना व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि काशी-वाराणसी विरासत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी साहित्य व मीडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आझाद मैदान येथील पत्रकार भवनात आयोजित या सोहळ्यात देशभरातील 17 राज्यांतील संपादक, लेखक, अभ्यासक आणि पत्रकार सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच उत्तर प्रदेश शासनाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले. हिंदीतील पहिले वृत्तपत्र ‘उदन्त मार्तण्ड’ याच्या प्रकाशनाला यावर्षी 200 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने हिंदी पत्रकारितेच्या इतिहासातील मोलाच्या योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कमलेश सुतार, रेखा देशपांडे, विश्वास देवकर, शरद वैद्य (मरणोत्तर) यांना सन्मानित करण्यात आले.







