बांगलादेशचा श्रीलंकेवर विजय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 38व्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या पराभवासह श्रीलंकेचा संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 49.3 षटकांत 279 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने सात गडी गमावून 282 धावा केल्या आणि सामना जिंकला.
बांगलादेश आणि इंग्लंड आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. आता श्रीलंकाही अधिकृतपणे अंतिम चारच्या शर्यतीतून बाहेर आहे. श्रीलंकेचा सध्याच्या स्पर्धेतील हा सहावा पराभव आहे. विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 49.3 षटकांत सर्व गडी गमावून 279 धावा केल्या होत्या. चरित असलंकाने 105 चेंडूंत 108 धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. बांगलादेशकडून तनझिम हसनने गोलंदाजीत 3 बळी घेतले. तर, शाकिब अल हसन आणि शोरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 41.1 षटकांत 7 गडी गमावून तीन गडी राखून सामना जिंकला.
बांगलादेशने 280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नझमुल हसन शांतोने 90 आणि शाकिब अल हसनने 82 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी मेहनत घेतली असली तरी मधल्या षटकांमध्ये शाकिब आणि शांतो यांच्यात झालेल्या 169 धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. या सामन्यात पुन्हा एकदा दिलशान मधुशंकाने श्रीलंकेसाठी सर्वाधिक तीन बडी बाद केले, तर महिश तिक्षाना आणि अँजेलो मॅथ्यूज यांना प्रत्येकी दोन गडी बाद करता आले.