सरकारी रुग्णालयात झाली दुर्बिण शस्त्रक्रिया

दहा वर्षात पहिल्यांदाच उपचार
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा सरकारी रुग्णालयात अतिगंभीर रुग्णांना उपचार मिळणे कठीण होते. एखादी मोठी शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना हमखास मुंबईमधील रुग्णालयाची वाट धरावी लागायची आता मात्र हा त्रास बंद होणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात गंभीर आतड्यांचा आजार असलेल्या दोन रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली तर अन्यएका रुग्णावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्रक्रिया करण्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे.

जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. याठिकाणी जिल्ह्यातून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण दाखल होतात. पूर्वी अपुरे डॉक्टर, शस्त्रक्रिया साधनाचा अभाव यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णाला मुंबईमध्ये उपचारासाठी पाठवले जात होते. पूर्वीपासून रुग्णालयात प्रसूती आणि इतर छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र अती गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया होत नव्हत्या.यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. जिल्हा रुग्णालय असूनही उपचार होत नसल्याची ओरड रायगडकर करीत होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपचार बाबतीत रुपडे बदलण्यास सुरुवात केली. डॉ देवमाने यांनी स्वतः शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णालयात विविध आजारांवर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत अशी एकही शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षात झाली नव्हती. जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या संगीता सुतार (48) रा. जांभूळपाडा, सुधागड याची सिटी स्कॅन आणि अन्य तपासणी केली असता आतड्या या पूर्णपणे सडल्या असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. कमी रक्त पुरवठा आणि वारंवार टायफाईड आजारामुळे संगीता यांचे आतडे निकामी झाले होते. संगीता यांची योग्य तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ. देव माने यांनी घेतला. त्यानुसार डॉ. देवमाने आणि त्याच्या पथकाने अडीच तास शस्त्रक्रिया केली. खराब आतडे काढून पुन्हा जोडण्यात आले. त्यामुळे त्याच्या जीविताचा धोका टळला असून सध्या अती दक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

देवराम हश्या (40) रा. आडगाव, श्रीवर्धन याच्या अती दारू सेवनाने आतड्याला छिद्र पडले असल्याचे तपासणीत निदान झाले. त्यानंतर देवराम याच्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया करून आतड्याचे छिद्र बंद करण्यात यश मिळाले. देवराम यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. मनीषा तांबोळी, (65) , मांडवा, अलिबाग याच्या पित्ताशयात खड्डे झाले होते. त्याच्यावरही दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करून बरे केले आहे. आतड्याच्या आजारावरील शस्त्रक्रिया दहा वर्षात पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत. तर इतर आजारावरील शस्त्रक्रिया ही रुग्णालयात सुरू केल्या असल्याने रुग्णांना जिल्ह्यातच योग्य उपचार मिळू लागले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांना योग्य आरोग्य सेवा जिल्ह्यातच मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. दहा वर्षात पहिल्यांदाच आतड्याच्या आजारावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यात येऊन यशस्वी झाली आहे. जिल्हा रुग्णालयात लहान मोठ्या आजारावरील शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी जिल्हा रुग्णालयाच्या सेवेचा लाभ घ्यावा.

-डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय
Exit mobile version