। माथेरान । वार्ताहर ।
मागील दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात माथेरानच्या जंगलाचे अतोनात नुकसान झाले. यात अनेक महाकाय 100 वर्षे जुनी झाडे पडली. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिरचे शिक्षक संघपाल वाठोरे यांच्या संकल्पनेतून सीडबॉल बीजारोपण करण्यात आले.
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे वृक्षांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. परिणामी, जंगले हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करणे, ही काळाची गरज झाली आहे. याच उद्देशाने नववीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सीडबॉल तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाचे माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी पर्यटकांसह आलेल्या पाहुण्यांना सीडबॉल भेट स्वरूपात दिले. तसेच, प्रवासात कोठेही फेकून द्या, अशी विनंती केली. पर्यटकांनी या संकल्पनेचे कौतुक करून आवर्जून ही भेट स्वीकारली.
या अनोख्या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त शशीभूषण गव्हाणकर हे मुंबईहून आले होते. यावेळी शाळेत आलेल्या पाहुण्यांना आणि माथेरानमधील पर्यटकांना सीडबॉल भेट दिले. भेट देतेवेळी सर्वांना प्रवासादरम्यान कोठेही फेकण्याची विनंती केली. पर्यटकांना ही संकल्पना फार आवडली. अनेकांनी आवर्जून सीडबॉल मागून घेतले. या प्रकल्पाचे संघपाल वाठोरे यांनी हा प्रकल्प आणखी मोठ्या स्वरूपात राबवून अनेक शाळांपुढे आदर्श ठेवता येईल, असे सांगितले. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनीही प्रकल्पाचे कौतुक करत यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
सीडबँकची उभारणी
मार्च-एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना बीज संकलन करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. त्यासाठी शाळेत सीडबँक स्थापन करण्यात आली. दररोज विद्यार्थ्यांनी बँकेत वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा करण्यास सुरुवात केली. त्याची नोंद वर्गात घेतली जाऊ लागली. घरात आणलेली फळे, परिसरातील इतर फळे यांच्या बिया फेकून न देता सीडबँकेत जमा करण्याचे आवाहन शाळेमार्फत केले जाऊ लागले. एप्रिल महिनाअखेरीस शाळेला सुटी लागण्यापूर्वी सीडबॉल बनवण्यासाठी साहित्याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली होती.
सीडबॉल काय आणि ते कसे बनवावे हे समजावून सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सीडबॉल बनवून एक छोटी सहल आयोजित केली. दगड फेकतो तसे हे सीडबॉल फेकण्यात आले. पाऊस पडल्यानंतर बीजांमध्ये अंकुर फुटले आहेत. शेण, पालापाचोळा आणि वारुळाच्या मातीच्या साह्याने जमिनीत तग धरून त्याची हळूहळू वाढ होईल.
संघपाल वाठोरे, प्रकल्प अधिकारी तथा शिक्षक