| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वे वरील कर्जत दिशेकडून नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी स्काय वॉक उभारला जात आहे. या स्काय वॉकसाठी मेन लाईनवरील गर्डर मुंबई रेल कॉर्पोरेशनच्या अभियंत्यांनी टाकला आहे. त्या भागातील गर्डर टाकण्याचे यशस्वी काम पूर्ण झाल्यामुळे नेरळ स्थानकातील स्काय वॉकच्या कामाला गती मिळाली आहे.
नेरळ जंक्शन स्थानकात मुंबई दिशेकडून कर्जत दिशेकडे असा स्काय वॉक फलाट एकवर बनविला जात आहे. साधारण दहा मीटर रुंदीचा हा स्काय वॉक असून, फलाट एकवरून हा स्काय वॉक मुंबई-पुणे मेन लाईनवरून फलाट एक आणि पुढे रेल्वे पार्किंग असा जात आहे. त्यामुळे स्काय वॉकचे बांधकाम करताना मुंबई-पुणे मेन लाईनवर कधी या स्काय वॉकचे गर्डर टाकले जाणार याकडे लक्ष लागून राहिले होते. त्या भागातील गर्डर मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फलाट एकवरून हा स्काय वॉक दहा मीटर रुंदीचा असून, मेन लाईनवरून हा या स्काय वॉकचा पादचारी पूल फलाट दोनवर उतरणार आहे. त्या दरम्यान हा स्काय वॉक दहा मीटर रुंदीचा असून, पुढे पार्किंगपर्यंत जाताना हा स्काय वॉकची रुंदी कमी करण्यात आली आहे. मेन लाईन तसेच माथेरानकडे जाणार्या मिनीट्रेन मार्गावरून गर्डर टाकण्यात आले असल्याने नेरळ स्थानकातील स्काय वॉक काही महिन्यात प्रवासी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही रेल्वे मार्गावर महत्त्वाचे असलेले गर्डर टाकण्यात आल्याने नेरळ स्थानकातील स्काय वॉकचे काम जलदगतीने पुढे जाणार आहे. या स्काय वॉकमुळे नेरळ स्थानकाबाहेर प्रवाशांची होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. खा. श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून स्काय वॉकचे काम सुरू आहे.