महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

1 कोटी 59 लाखांचा मुद्देमाल ताब्यात; वाहनचालकास अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

| महाड | प्रतिनिधी |

महाडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या रॉयल ब्ल्यू दारूचे तब्बल 1 हजार 480 बॉक्स जप्त केले आहेत. या कारवाईत दारूसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 1 कोटी 59 लाख 26 हजार 400 रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव विभागाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

गोवा ते गुजरात दरम्यान अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करत आरजे 19 जीई 4115 क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या रॉयल ब्ल्यू दारूचे तब्बल 1 हजार 480 बॉक्स आढळून आले. ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस.पी. पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक, जवान डी.डी. पोटे आणि जवान मनोज गायकवाड यांनी सहभाग घेतला. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा गोवा येथून गुजरातच्या दिशेने नेला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, हा साठा नेमका कोणासाठी आणि कुठे नेला जात होता, तसेच या अवैध वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे गोवा बनावटीच्या दारूची राज्यातून होणारी अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली असून, या प्रकरणातील पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version