| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शासनाकडून वाटप करण्यात येणारे धान्य हे नागरिकांना खाण्यासाठी देण्यात येत असते. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तांदुळांमध्ये वारंवार अळ्या व उंदराच्या लेंड्या सापडण्याच्या घटना घडत आहेत. अशातच श्रीवर्धन शहरातील प्रभू आळी परिसरात असणाऱ्या रास्त भाव धान्य दुकानातील तांदळामध्ये अळ्या व उंदराच्या लेंड्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाकडून वितरित करण्यात येणारे धान्य रास्त भाव धान्य दुकानदार नागरिकांना वितरित करत असतो. या दुकानदाराकडे धान्य आल्यानंतर त्याचे वितरण त्वरित सुरू करण्यात येते. त्यामुळे हे धान्य दुकानदाराच्या दुकानात जास्त दिवस पडून नसते. त्यामुळे शासकीय गोदामांमध्ये ठेवण्यात येणारे धान्य हे सुरक्षित रहावे. याबाबत प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. कारण शासकीय धान्य गोदामात आल्यानंतर गोदामांची झालेली दुरावस्था, त्यामुळे या परिसरामध्ये घुशी व उंदीर मोठ्या प्रमाणात घुसून धान्याची नासाडी करत असतात. तर, अनेकवेळा गोदामात आलेले धान्य हे जास्त जुने झाल्यामुळे त्यामध्ये अळ्यादेखील पडतात. त्यामुळे आलेल्या धान्याची तपासणी करूनच ते वितरण करण्यासाठी पाठवावे, अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे. या प्रकाराबाबत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ भ्रमणध्वरीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. महसूल विभागातील अधिकारी श्रीवर्धन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे काम करण्यामध्ये व्यस्त असले तरी त्यांनी पत्रकारांनी केलेले फोन उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







