बापरे! जिल्हा रुग्णालयातील पाण्याच्या फिल्टरमध्ये अळ्या

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील जिल्हा रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि अळ्या आढळल्या आहेत. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अशुद्ध पाणी पियावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या अशा बेफिकरी कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील आंतर रुग्ण इमारतीमध्ये असणार्‍या फिल्टरमध्ये मातीसह अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच नवजात शिशू यांच्या विभागात असणार्‍या फिल्टरमध्येही काही प्रमाणात माती मिश्रीत पाणी आढळून आले आहे.

या फिल्टरची पाहणी करत असताना तेथील रुग्ण आणि नातेवाईकांनी या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येत असल्याची तक्रार केली. हे पाणी आम्ही किंवा माता यांना दिल्यास उलट्या, जुलाबाची बाधा होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रुग्णालय हे औषधोपचार, रुग्ण बरे होण्यासाठी आहे की आजार प्रसारासाठी, असा सवालही त्यांनी केला. पाण्याला येणार्‍या वासाबद्दल येथील कर्मचार्‍यांकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले.


रात्री साडेअकराच्या सुमारास एका रुग्णाच्या नातेवाईकाचा फोन आला. येथील आंतररुग्ण विभागातील अतिदक्षता विभागाबाहेरील फिल्टरमधून बाटलीत पाणी घेतल्यावर त्यात किडे आणि माती आढळली, अशी तक्रार संबंधीताने केली. याची शहानिशा करण्यासाठी रुग्णालयात गेलो तेव्हा पाण्याच्या बाटलीत काही किडे आणि माती असल्याचे दिसून आले.

सागर पेरेकर,
सामाजिक कार्यकर्ते, अलिबाग


जिल्हा रुग्णालयातील फिल्टरची त्वरित स्वच्छता करून घेतली जाईल. काही ठिकाणी फिल्टर खराब झाले असतील ते बदलण्यात येतील. शिवाय दोन दिवसाआड सर्व फिल्टरची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागातील कर्मचार्‍यांना देण्यात येतील.

डॉ. निशिकांत पाटील,
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक

Exit mobile version