| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-कश्मीरमधील अंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरणा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-कश्मीरमध्ये सुरू केलेल्या शोधमोहिमेला यश आले असून, बांदीपुरा येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर अल्ताफ लाली याचा खात्मा करण्यात आला आहे.
बांदीपुरा जिल्ह्यातील कुलनार भागामध्ये शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दुसरीकडे कुलनार भागात अद्यापही चकमक सुरू आहे. जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, लष्करच्या टॉपच्या कमांडरचा खात्मा केला आहे.
दोन संशयित दहशतवाद्यांची घरं उडवली
पहलगाम हल्ल्यात सहभागी असणार्या दोन संशयित दहशतवाद्यांची घरे शुक्रवारी सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केली. बिजबेहरा येथील आदिल हुसेन ठोकर याचे घर आयईडी स्फोटाने उडवण्यात आले, तर त्रालमधील आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. पहलगाम हल्ल्यात सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्यांना आदिल ठोकर याने मदत केली होती. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.