| पनवेल | प्रतिनिधी |
राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर दि.1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामे ही रोखण्यात येणार आहेत.
नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. दरम्यान, दि.30 जूनपर्यंत बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना दि.1 जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. तसेच, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर दि.30 जूनपूर्वी नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस
