उपचारांना देताहेत प्रतिसाद; डॉक्टरांची माहिती
। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वार्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लतादीदींवर उपचार करणार्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तातडीने ब्रीच कँडीत धाव घेतली असून डॉक्टरांकडून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच मंगशेकर कुटुंबीयांशीही संवाद साधून राज हे लतादीदींच्या प्रकृतीची माहिती घेतली. मंगेशकर कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध असणार्यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, मंगेशकर कुटुंबीय आणि मंगेशकर कुटुंबीयांशी संबंधितांनाच रुग्णालयात सोडण्यात येत आहे. इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची व न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे.
व्हेंटिलेटर हटवला होता
गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडीत उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारांना प्रतिसादही द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. त्यामुळे त्या लवकरच घरी परततील असे सांगितले जात होते. मात्र, शनिवारी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने चिंता वाढली आहे.