। पनवेल । प्रतिनिधी ।
स्व. गोकुळशेठ हे एक काँग्रेसचे रत्न होते. त्यांच्यामुळे पनवेलमध्ये काँग्रेस जिवंत राहिली. स्व. गोकुळशेठ यांना त्या काळी शेकापक्षात घेण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, त्यांची काँग्रेसवर नितांत निष्ठा होती. त्यावेळी मला स्व. प्रभाकर पाटील म्हणाले की, गोकुळशेठ शेकापक्षात आले तर पक्षाला जिल्ह्यात मोठा फायदा होईल. त्यावेळी शेकापक्ष आणि काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष होता. मात्र, निष्ठा असावी तर स्व. गोकुळशेठ यांच्यासारखी असावी, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील यांनी केले. स्व. गोकुळशेठ पाटील यांचे दि. 16 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.
याप्रसंगी आ. जयंत पाटील यांच्यासह माजी आमदार मुश्ताक अंतुले, माजी आ. बाळाराम पाटील, माजी आ. मनोहर भोईर, माजी आ. हुस्नबानू खलिफे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.सी. घरत, जी.आर. पाटील, ॲड. प्रवीण ठाकूर, जगदीश गायकवाड, डॉ.भक्तीकुमार दवे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, सुरदास गोवारी, ॲड. के.एस. पाटील, आरपीआय कोकण प्रदेश चिटणीस के.के. गायकवाड, राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, माजी नगरसेवक जयंत पगडे, हरेश केणी, मिलिंद पाडगावकर, वैभव पाटील, उद्योजक प्रताप गावंड, फुलचंद गुप्ता, माजी नगरसेविका शशिकला सिंह, श्रुती म्हात्रे, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे, लीना गरड, हेमराज म्हात्रे, ॲड.मदन गोवारी, लतिफ शेख यांच्यासह सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पारमार्थिक मंडळी यांच्यासह सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, स्व. बॅरिस्टर अंतुले साहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. स्व. गोकुळशेठ हे एक काँग्रेसचे रत्न होते. त्यांच्यामुळे पनवेलमध्ये काँग्रेस जिवंत राहिली. प्रत्येक निवडणुकीत मोठी फौज घेऊन ते प्रचाराला जात असत. सुदाम पाटील आणि माझे मैत्रीचे संबंध स्व. अंतुले साहेबांच्या घरीच झाले. पुन्हा काँग्रेस सत्ताधीश झाली पाहिजे हे गोकुळशेठ यांचे स्वप्न होते. रोडपालीत स्व. गोकुळशेठ यांचे स्मारक बांधावे, यासाठी काही मदत लागल्यास मी ठामपणे पाठीशी आहे, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली.
माजी आ. बाळाराम पाटील म्हणाले, पनवेलच्या राजकारणातील बुजुर्ग आणि आदर्श नाव म्हणजे स्व. गोकुळशेठ पाटील. ज्यावेळेस संघर्षाचा काळ होता त्या काळात त्यांनी धडाडीने काम केले. रोडपाली आणि नावडे ही दोन गावे पनवेलच्या राजकारणाची केंद्रबिंदू राहिली आहेत. मात्र, कोणाशी कितीही वाद असले तरीही प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन ते आदबीने विचारपूस करायचे. राजकारणातील हेवेदावे विसरून ते प्रत्येक सामाजिक कार्यात उपस्थित राहायचे. राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र गोकुळशेठ बदलले नाहीत. त्यांची निष्ठा कमालीची होती. गोकुळशेठ यांच्या अंत्यविधीला जमलेला जनसमुदाय पाहून त्यांनाही स्वर्गात समाधान वाटले असेल.
यावेळी माजी आ. मुश्ताक अंतुले म्हणाले, त्याकाळी पनवेल, उरण, अलिबाग, पेण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शेकापमध्ये नेहमीच वाद व्हायचे. मात्र स्व. गोकुळशेठ यांनी पनवेलसारख्या मोठ्या तालुक्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. माजी मुख्यमंत्री स्व.बॅ. अंतुले साहेबांना शेवटपर्यंत साथ दिली. संपूर्ण अंतुले कुटुंबियांवर त्यांचे ऋण आहेत. अनेक निवडणुका माझ्या डोळ्यासमोर आहेत. एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांनी नेहमीच काँग्रेसची खिंड लढवली. स्व. गोकुळशेठ यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नसून एका विचारचे आणि पिढीचे जाणे आहे. मागच्या पिढीतील स्व.गोकुळशेठ हे मोठे नाव होते. त्यांचे जाणे आज साऱ्यांच्याच जिव्हारी लागले आहे.
माजी आ. हुस्नबानू खलिफे म्हणाल्या, मी वर्षभर पनवेलची निरीक्षक म्हणून काम करीत आहे. मात्र, स्व. गोकुळशेठ यांच्या प्रकृतीमुळे त्यांना भेटण्याचा योग आला नाही हे माझे दुर्भाग्य समजते. आज त्यांच्या जाण्याने सारेजण शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्याविषयी साऱ्यांच्या आठवणी ऐकताना गोकुळशेठ यांची कीर्ती किती महान होती याची जाणीव होते. ॲड. प्रवीण ठाकूर म्हणाले, राजकारणासह समाजकारणासाठी स्व. गोकुळशेठ यांनी झोकून काम केले. त्यांनी जिल्हा परिषद लढवली, मात्र मी म्हणेन की ते आमदार किंवा त्याहून उच्चपदावर जाण्याइतकी त्यांची कार्यशैली होती. माझे वडील स्व. माजी आमदार मधुशेठ ठाकूर आणि स्व.गोकुळशेठ यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे स्व. गोकुळशेठ यांचा नेहमीच सहवास लाभायचा. त्यांच्या जाण्याने अतोनात दुःख होतं आहे. माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.भक्तीकुमार दवे, काँग्रेस नेते आर.सी. घरत यांनीही स्व. गोकुळशेठ यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.