| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरीबांचे कैवारी, कोकणचे भाग्य विधाते स्व. प्रभाकर पाटील अर्थात भाऊ यांचा स्मृतिदिन शनिवारी (दि.21) अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्व. प्रभाकर पाटील यांनी सामाजिक, सहकार, राजकीय, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात काम करीत असताना तळागाळातील घटकाचा विकास साधण्यावर अधिक भर दिला. पोयनाडचे सरपंचपासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, बांधकाम सभापती अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. 21 फेब्रुवारी 2000 मध्ये प्रभाकर पाटील तथा भाऊंचे निधन झाले.
रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारी (दि.21) त्यांचा 26 वा स्मृतिदिन वेगवेगळ्या संस्था संघटनाच्या वतीने साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ व स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्या वतीने स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन अलिबागमध्ये साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आर. के. घरत, अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव नंदू तळकर, झेबा कुरेशी आदी मान्यवर, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. यावेळी नागेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्व. प्रभाकर पाटील यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अलिबागमधील शेतकरी भवनमधील सभागृहात भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, संदीप सारंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबागसह पेण, उरण, पनवेल व अन्य तालुक्यांमध्ये स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा
