विद्यार्थ्यांच्या आवाजावर लाठीचा प्रहार, लोकशाहीवर हुकूमशाहीचा वार!
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रचंड मानसिक ताण सहन केला, तर काहींनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येच्या घटना समोर आल्या. अशा गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची न्याय्य मागणी आहे. मात्र, उत्तर देण्याऐवजी सरकारने शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा आणि पोलिसी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना गुन्हेगारांप्रमाणे वागवून लोकशाहीचा नव्हे तर हुकूमशाहीचा चेहरा समोर आणला. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असायला हवी होती; पण आज त्यांच्या अंगावर लाठ्या बरसत आहेत. त्यामुळे हाच का मोदी सरकारचा मअमृतकाळफ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सोमवारी (दि.20) जंतरमंतरवर जमा झालेल्या देशभरातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संसदकडे कूच केली. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तर काही विद्यार्थ्यांवर चक्क लाठीचार्ज करुन त्यांना धक्काबुक्की केल्याचे प्रकारही घडले. त्यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले असून अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटल्याची माहिती समोर आली.
लाठीने विचार दडपता येत नाहीत. अश्रुधुराने सत्य झाकता येत नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा आणि या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली.
सरकारशी चर्चेनंतरही आंदोलन आणखी भडकले
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र, चर्चेत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचा दावा करत आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे कूच करण्याचा निर्णय कायम ठेवला. सरकारने प्रश्न सोडविण्याऐवजी वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याचा आरोपही सीजेपीकडून करण्यात आला.
संसद परिसर छावणीत; हजारो जवान तैनात
'चलो संसद' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन, विजय चौक, जंतर-मंतर आणि आजूबाजूचा परिसर अक्षरशः पोलीस छावणीत बदलला होता. दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. अनेक मार्गांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले, तर काही मेट्रो स्थानकांवरही कडक निर्बंध लागू करण्यात आले.
विद्यार्थ्यांना न्याय हवा, लाठी नाही
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी पेपरफुटी करणाऱ्यांवर कारवाई करा, शिक्षण वाचवा, प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना रोखण्यासाठी पोलीसबळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
वांगचुकांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद
गेल्या वीस दिवसांपासून उपोषणावर असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतरही त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक संघटना मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाल्या. त्यामुळे चलो संसद आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या
सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत.
