राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम पुस्तिकेचे अनावरण

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

माता आणि बालके सदृढ रहावी, यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत माता व बालकांना सशक्त करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबविले जात आहे. या पोषण महिना कालावधीत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण मंगळवारी (दि.6) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांच्यासह महिला व बालकल्याण विभाग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय पोषण महिना अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. 30 दिवस चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजनांची व्यापक प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

Exit mobile version