। पनवेल । वार्ताहर ।
आपल्या परंपरागत सेवा ग्राहकांना देण्यासोबतच भारतीय डाक विभाग आणखी वैविध्यपूर्ण सेवा ग्राहकांना देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने रेल डाक गती शक्ती एक्स्प्रेस सेवाप्रकल्प (संयुक्त पार्सल उत्पादन सेवा) सुरू करण्यात आला आहे. या योजनेच्या पनवेल ते दिल्ली या टप्प्याचा शुभारंभ पनवेल रेल्वे स्टेशन येथे करण्यात आला.
या प्रकल्पासाठी राजधानी एक्स्प्रेसच्या पार्सल सेवेचा वापर करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी दोन टनांचे पार्सल पनवेल रेल्वे स्थानकावर बुक करून यशस्वीरित्या पाठवण्यात आले आहेत. या सेवेचा शुभारंभ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस सरन्या यू, सुधीर झाकिरे, नितीन येवला, अमोल राऊत, मुंबई विभाग आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी नवी मुंबई डाक विभागातील शेषासाई बिझनेस फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हीनस सेफ्टी अँड हेल्थ प्रा.लि., स्टार एक्स्प्रेस प्रा.लि., थायरोकेअर टेक्नॉलॉजीज या उद्योगांनी डाक विभागाच्या या योजनेच्या माध्यमातून आपली उत्पादने पनवेल येथून दिल्ली येथे पाठवली.