। पेझारी । वार्ताहर ।
पेझारी येथे खारेपाटातील पहिल्या बालनाट्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अनंत थिएटर्स पेझारी,अलिबाग या संस्थेमार्फत राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत उदय गोडबोले लिखित आणि राजन पांचाळ दिग्दर्शित ‘सुखी सदर्याचा शोध’ हे बालनाट्य घेऊन उतरत आहेत.
यावेळी माजी जि.प.सदस्या चित्रा पाटील, निर्माते सौरभ आपटे, डॉ. सुहानी आपटे, अभिनेत्री ज्योती राऊळ, अभिनेत्री अर्चना पाटील आणि अभिनेता योगेश पवार पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुत्रसंचालन देवेंद्र केळुसकर यांनी केले. यावेळी अभिनेता प्रतिक पानकर, निनाद पाटील, प्रमोद पाटील, रश्मी पांचाळ, राजेंद्र म्हात्रे सर, बाल कलाकार आणि पालक उपस्थित होते. बाल कलाकारांनी छान एकपात्री सुद्धा सादर केल्या.
याप्रसंगी चित्रा पाटील यांनी आपल्या भाषणात शालेय आणि कॉलेज जीवनातील अभिनय आणि क्रिडा क्षेत्रातील आठवणी अनुभव बालकलाकारांना संबोधन करताना सांगितल्या. बालनाट्याला शुभेच्छा दिल्या. अनंत सांस्कृतिक कलामंचाच्या कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीचे कौतुक केले. नाटकाची आवड, नाटकात काम करण्याची निवड नवीन पिढीमध्ये कमी होत चालली आहे. ही खंत नेहमी आम्हाला असायची. याचाच विचार लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजन पांचाळ यांनी केला आणि नवीन पिढी घडवूया या विचाराने बालनाट्याची सुरुवात केली, असे त्यानी सांगितले.
कलाकार योगेश पवार म्हणाले की, लहान मुलांनी दिग्दर्शकाने आपल्या भूमिका समजावतील, त्याचा नीट अभ्यास करून त्यात आणखी काय करता येईल याचा विचारही करावा. पालकांनी मुलांना नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहन देत रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.