। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 तालुक्यातील तब्बल 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींमध्ये 240 जागांसाठी सरपंच पदांचे 25 अर्ज दाखल करण्यात आले तर 1 हजार 940 सदस्यपदांसाठी पाच तालुक्यातील 14 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
240 ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील सहा, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील सात, खालापूर तालुक्यातील 14, तळा तालुक्यातील एक, पनवेल तालुक्यातील 10, पेण तालुक्यातील 26, पोलादपूर तालुक्यातील 16, महाड तालुक्यातील 73, माणगाव तालुक्यातील 19, मुरुड तालुक्यातील पाच, म्हसळा तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील पाच, श्रीवर्धन तालुक्यातील 13, सुधागड तालुक्यातील 14 या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आज पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 10 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींपैकी एका ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्यात आला. कर्जतच्या सात पैकी तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले. रोहा तालुक्यात पाचपैकी तीन तर सुधागड तालुक्यातील 14 पैकी एक, सर्वाधिक 73 ग्रामपंचायतींच्या निवडणूका असलेल्या महाड तालुक्यातील दोन सरपंच पदाचे अर्ज दाखल करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील 16 पैकी चार सरपंचपदाचे अर्ज दाखल झाले.
त्याचप्रमाणे 240 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 940 सदस्यपदांसाठी 14 अर्ज पहिल्या दिवशी सादर करण्यात आले. यात पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या 226 जागांपैकी चार अर्ज सादर करण्यात आले. तर रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी 37 सदस्यपदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाला. सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींपैकी 110 सदस्यपदांसाठी तीन नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 116 सदस्यपदांसाठी पाच अर्ज भरण्यात आले. तर म्हसळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींपैकी 97 जागांसाठी एकमेव अर्ज भरण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रम
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर – अर्ज दाखल करणे
5 डिसेंबर – नामनिर्देशनपत्रांची छाननी
7 डिसेंबर – अर्ज माघारी
18 डिसेंबर – मतदान
20 डिसेंबर – मतमोजणी