| माणगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्र कृषी दिन तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कशेणे गावात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम रोहा कृषी विज्ञान केंद्र आणि कशेणे येथील श्री हनुमान शेतकरी विकास गटाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला. यावेळी पर्यावरण संवर्धन आणि भविष्यात कशेणे परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने कडुलिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कोळवणकर यांच्या नर्सरीपासून झाली. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत तळाशेतचे प्रांगण, जिल्हा परिषद रुग्णालय इंदापूर, कालवा परिसर तसेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कडुलिंबाची झाडे लावण्यात आली. यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड वाढविण्याची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. तसेच, उपस्थित ग्रामस्थांना त्यांच्या परसबागेत लागवड करण्यासाठी प्रत्येकी एक रोप मोफत वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा मालोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे, कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथील शास्त्रज्ञांची टीम तसेच कशेणे गावातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ऑक्सिजन पार्क’ संकल्पनेला प्रारंभ
