एका माशासाठी चक्क लाँच सेवा केली ठप्प

। उरण । वार्ताहर ।
मोरा-मुंबई जलमार्गाचा प्रवास नागरिकांसाठी खडतर बनत असताना, या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना चालकांची मुजोरी सहन करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रातील एका माशासाठी लाँच चालकांकडून प्रवाशांना 15 मिनिटे वेठीस धरण्याचा प्रकार बुधवारी (दि.27) घडला आहे.

बुधवारी सकाळी 10 वाजता मोरा जेट्टीवरून सुटलेल्या साई दरबार ही लाँच प्रवाशांना मुंबई, भाऊचा धक्का या दिशेने जात असताना, बुचर आयलँड नजीक समुद्राच्या पाण्यात एक मासा तरंगताना लाँच कर्मचार्‍यांना दिसला. यानंतर हा मासा पकडण्यासाठी तब्बल 15 मिनिटे लाँच पाण्यात पुढे मागे करत तो मासा पकडण्यात आला. मात्र या सर्व प्रकारामध्ये प्रवाशांना 15 मिनिटे चालक आणि कर्मचार्‍यांकडून वेठीस धरण्याचे काम करण्यात आले. या लाँचने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे नोकरीनिमित्त अथवा वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे जाणारे प्रवासी असतात. मात्र अशा पद्धतीने प्रवाशांचा वेळ घेणे योग्य नसून, याबाबत प्रवाशांकडून विचारणा करताच कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे.

Exit mobile version