बांगलादेशात अराजकता; पंतप्रधान शेख हसीना यांचा पदाचा राजीनामा

लष्कर स्थापन करणार अंतरिम सरकार


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, देशाची कमान आता लष्कराच्या हाती आली आहे. बांगलादेशच्या लष्कराने पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्यासाठी 45 मिनिटांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला. त्यामुळे बांग्लादेशचे लष्कर आता अंतरिम सरकार स्थापन करणार आहे.

शेख हसीना यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये ’न भूतो न भविष्यती’ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेख हसीना या पुढील काही काळासाठी भारतात आश्रय घेऊ शकतात, असेही सांगितले जात आहे. बांगलादेशमध्ये सध्या प्रचंड मोठा नागरी संघर्ष सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती गंभीर झाली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरत जाऊन टोकाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर आपण ही परिस्थिती हाताळू शकणार नाही, हे ध्यानात आल्यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.

बांगलादेश लष्करप्रमुख वकार-उर-झमान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, शेख हसीन यांनी राजीनामा दिला आहे. ॠअंतरिम सरकार स्थापन केले जाईल. सर्वांनी संयमी राहावे. आम्ही अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. सर्वांनी शांतता राखावी. हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. प्रत्येक हत्या आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांचा गांभीर्याने विचार केला जाईल. सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे आले होते आणि ही चांगली गोष्ट घडली आहे. सर्वपक्षीय बैठकीत अवामी लीगचे कोणीही नव्हतं. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत.

शेख हसीना यांना घेऊन लष्करी हेलिकॉप्टर सोमवारी दुपारी अडीच वाजता ढाक्यातील बंगभवन येथून निघाले. त्यावेळी त्यांची धाकटी बहीण शेख रेहानाही त्यांच्यासोबत होती. त्या हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बांग्लादेशातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प आहे. सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षणाला विरोध करणार्‍या विद्यार्थी गटांच्या हिंसाचारामुळे बांग्लादेशात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

नोकर्‍यांमधील कोटा पद्धतीवरून शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या संघटनेच्या माध्यमातून अनेक संघटना एकत्रित आल्या होत्या. अवामी लीग, छात्र लीग, युवा लीग यांनीही यामध्ये सहभाग घेतला. रविवारी झालेल्या चकमकीत 14 पोलिसांसह किमान 101 लोक मारले गेले. हिंसाचारामुळे अधिकार्‍यांना मोबाईल इंटरनेट बंद करण्यास आणि देशभरात अनिश्‍चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यास भाग पाडले. पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रणही विरोधकांनी नाकारले. दोन गटांतील संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. मारले गेलेले बहुतेक पोलीस होते. आंदोलकांनी पोलिस स्टेशन, पोलिस चौक्या, सत्ताधारी पक्ष कार्यालये आणि त्यांच्या नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ला केला आणि अनेक वाहने पेटवून दिली.

Exit mobile version