। पनवेल । प्रतिनिधी ।
न्यायालयाच्या बनावट आदेशाची प्रत फसवणूक करण्याच्या उद्देशाने एड. व्ही के शर्मा यांनी तयार करून सागर घरत यांना देऊन लाधवजी पटेल आणि न्यायालयाची फसवणूक केली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी एड. व्ही के शर्मा राहणार खारघर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहर पोलिसांनी या वकिलाला अटक केली आहे.
यातील तक्रारदार लाधवजी पटेल हे बांधकाम व्यवसायिक असून, वाशी येथे राहतात. त्यांच्या कंपनीला व्यवसायासाठी उलवे येथील सेक्टर 17 मधील एकूण क्षेत्र 10.50 गुंठे ही जमीन खरेदी करण्यासाठी मयत हिस्सेदार शेतकरी मदन घरत यांचे वारस असलेली अल्पवयीन मुले यांचे मायनर सर्टिफिकेट काढणे आवश्यक होते. त्यासाठी जुलै 2025 मध्ये सागर घरत याने सदरचे प्रमाणपत्र त्याच्या ओळखीचे एड. व्ही के शर्मा यांच्याकडून लवकरात लवकर काढून घेतो असे सांगून एक लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे १० सप्टेंबर रोजी सागर घरत यांच्या ओळखीचे एड. व्ही के शर्मा याने अल्पवयीन मुलांचे मायनर प्रमाणपत्र संदर्भातील न्यायाधीशांची बनावट सही व शिक्का असलेली न्यायालयाचे बनावट आदेशाची प्रत फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केली आणि सागर घरत राहणार ओवळे यांना देऊन न्यायालयाची आणि पटेल यांची फसवणूक केली. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी आरोपी एड. व्हिके शर्मा या वकिलाला अटक केली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फसवणूक करणाऱ्या वकिलाला अटक
