टँकर चोरी करणार्‍या चौघांना एलसीबीने केले जेरबंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पाण्याचा टँकर चोरुन नेणार्‍या चार आरोपींंचा छडा दहा दिवसात लावून त्यांना जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे.
याबाबतचे वृत्त असे की, खोपोली पोलीस ठाणे हद्दीतून 10 नोव्हेंबर रोजी एक पाण्याचा टँकर चोरी झाल्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरी गेलेला टँकर अहमदनगरच्या बाजूला गेलेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या पथकाने अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने आरोपी सचिन पोपट फुलारी वय-29 रा.भेंडा(बु) ता.नेवासा, महेश हरीचंद्र भेंडेकर वय-23 रा.भक्तरपूर ता.नेवासा जिल्हा-अहमदनगर, संदीप सर्जेराव जाधव वय-29 रा.भक्तरपूर ता. नेवासा जिल्हा-अहमदनगर, रोहिदास देविदास शिंदे वय-32 रा. मांडवे (तिसगाव) ता.नेवासा जिल्हा-अहमदनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा लाल रंगाचा पाण्याचा टँकर जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील योग्य कारवाई करिता खोपोली पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार राजा पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, नाईक राकेश म्हात्रे, देवराम कोरम यांनी केली आहे

Exit mobile version