| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघात झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची पंचांशी चांगलीच बाचाबाची झाली होती. यानंतर आयसीसीने हरमनप्रीतवर कडक कारवाई करत दोन सामन्यांची बंदी घातली. भारताच्या कर्णधारावरच बंदीची कारवाई झाल्याने संघाला आपली नवी कर्णधार शोधावी लागली. यानंतर संघ व्यवस्थापनाने भारताची उपकर्णधार स्मृती मानधना ही चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी भारतीय संघाचे नेतृत्व करेल अशी माहिती दिली.
बांगलादेश दौऱ्यानंतर आता भारतीय महिला संघ चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 मध्ये सहभागी होणार आहे. भारतीय महिला संघाचे आयसीसी क्रमवारीत स्थान चांगले असल्याने ते थेट क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले आहेत. मात्र या महत्वाच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर दोन सामन्यांच्या बंदीमुळे खेळू शकणार नाही. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाची धुरा हा उपकर्णधार स्मृती मानधनाच्या खांद्यावर असणार आहे. तिच्यावर संघाला फायनलमध्ये पोहचवण्याची मोठी जबबादारी असणार आहे. यंदाचे एशियन गेम्स हे चीनच्या हांग्झहोऊमध्ये 19 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
दरम्यान, बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातील वादानंतर हरमनप्रीत कौरवर म्हणून मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली. याचबरोबर हा लेव्हल 2 चा गुन्हा असल्याने तिला तीन डिमेरीट्स पॉईंट्स मिळाले. कौरवर आयसीसीच्या 2.8 नियमाखाली कारवाई करण्यात आली. याचबरोबर सामन्यानंतरही अंपायर्सवर टीका केल्याप्रकरणी देखील तिच्या मॅच फीमधून 25 टक्के रक्कम कापून घेतली होती. तो लेव्हल 1 चा गुन्हा होता.
हरमनप्रीत कौरची एशियन गेम्समधील अनुपस्थिती भारताला फार महागात पडू शकते. भारतीय महिला क्रिकेट संघाला आयसीसीमध्ये ट्रॉफी जिंकण्यात सातत्याने अपयश येत आहे. भारतीय संघाला कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. टी 20 विश्व चषकामध्ये देखील भारत फक्त उपांत्यफेरीपर्यंतच मजल मारू शकला. याचबरोबर 2022 च्या एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत देखील त्याला अंतिम चार संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. े भारतीय संघाला आपला हा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची नामी संध आहे. मात्र त्यांना आता हरमनप्रीत कौरशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे.