भाजपला सर्वत्र पराभव
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. भाजपला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळविता आलेले नाही.
राज्यात सांगली, जळगाव, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक घेण्यात आली.याचा निकाल जाहीर झाला असून,सांगलीमध्ये महाविकास आघाडीने 21 जागांपैकी 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 14 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने आधीच तीन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणार्या भाजपाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
लातूर बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर काँग्रेसचाच झेंडा फडकला. 9 पैकी 8 जागांवर काँग्रेसच्या सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आलेएका जागेवर भाजपच्या लोकशाही बचाव पॅनलचा उमेदवार टॉसच्या माध्यमातून विजयी झाला आहे. 19 जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र 10 जागेवर भाजपा प्रणित लोकशाही पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज बाद ठरले.
जळगावमध्ये महाविकास आघाडी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपनं बहिष्कार टाकल्याने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवित महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे आमदार संजय सावकारे यांचा विजय आणि रावेर सोसायटी मतदारसंघातून माघार घेतलेल्या उमेदवाराचा विजय हे निकालाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.