ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओम कबड्डी, ग्रिफिन जिम संघाची आगेकूच

। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ-वळगांव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 66व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओम कबड्डी कल्याण, ग्रिफिन जिम नवी मुंबई यांनी 5-5 चढायांच्या डावात विजय मिळवित पुढची फेरी गाठली.
ठाण्यातील वळगांव-भिवंडी येथील स्व. जाईबाई काशीनाथ पाटील क्रीडानगरीत सुरू असलेल्या पुरुषांच्या अ गटात ओम कल्याण संघाने मध्यांतरातील 7-19 अशा 12 गुणांच्या पिछाडीवरून आत्माराम मंडळाला पूर्ण डावात 30-30 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर निर्णयासाठी दिलेल्या 5-5 चढायांच्या डावात 8-05 असे चकवित दुसरी फेरी गाठली. रक्षित कुंदर, सुनील चव्हाण, आदित्य चाळके या विजयाचे शिल्पकार ठरले. रोहन पाटील, संदीप यांनी पराभूत संघाकडून उत्कृष्ट खेळ केला, पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. पुरुषांच्या दुसरा सामना देखील चुरशीचा झाला. त्यात नवी मुंबईच्या ग्रिफिन जिमने ठाण्याच्या होतकरूला 5-5 चढायांच्या डावात 6-5 असे चकवीत विजयाला गवसणी घातली. मध्यांताराला ग्रिफिन संघाकडे 21-19 अशी आघाडी होती. पूर्ण डाव 36-36 असा बरोबरीत राहिला. सौरव सणस, विशाल विनिराजद ग्रिफिनकडून, तर सौरभ मिश्रा, सौरभ कोंडे होतकरूकडून उत्तम खेळले.

Exit mobile version