सर्जिकल आणि मेडीकल वार्डमध्ये साचले पाणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी मेडीकल व सर्जिकल महिला कक्षामध्ये पडत आहे. या पाण्याच्या गळतीपासून बचाव करण्यासाठी प्लास्टीक बादल्यांचा आधार घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मागील आठवड्यात देखील पावसाचे पाणी सर्जिकल वार्डेमध्ये घुसले होते. या वार्डेला तळ्याचे स्वरूप आले होते.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय अडीचशे खाटांचे आहे. रुग्णालय 38 वर्षे जूने आहे. रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था बिकट झाला आहे. स्लॅब कोसळणे, पाण्याची गळती होणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. करोडो रुपये खर्च करून सध्या रुग्णालयाची दुरुस्ती केली जात आहे. ते काम संथ गतीने सुरु आहे. गेली अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीचा फटका जिल्ह्याला बसत आहे. महिला वैद्यकिय कक्षामध्ये पावसाच्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या भागात पाणीच पाणी होऊ लागले आहे. या गळती पासून बचाव करण्यासाठी प्लास्टीकच्या बादल्यांचा आधार घेण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे. काही ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे खिडक्या उघड्या आहेत. त्या खिडक्यांमधून पावसाचे पाणी रुग्णालयात शिरत आहे. रुग्णालयात पाणी पडत असल्याने रुग्णांसह कर्मचार्यांचेदेखील हाल होत आहे. या पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. त्यामध्ये सर्जिकल वार्ड जवळ प्लास्टीक कापड लावण्यात आले आहे. पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नये यासाठी हा प्रयोग केला आहे. परंतु त्यावर ठोस उपाय करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे.
रुग्णांचा नातेवाईक सुदैवाने बचावला
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या नातेवाईकांना पाहण्यासाठी एक इसम आला होता. त्याच्या सोबत त्याचा तीन वर्षाचा लहान मुलगादेखील होता. पावसाची रिपरिप सुरु होती. रुग्णालयाच्या आवारात मुलाला घेऊन जात होता. पाण्याच्या अंदाज न आल्याने तो आवारात असलेल्या नाल्यामध्ये पडला. सुदैवाने तो नाल्यातून सुखरूप निघाला. परंतु त्याच नाल्यात त्याचा मुलगा पडण्याच्या स्थितीत होता. परंतु त्याने सतर्कता दाखवत मुलाला नाल्यात पडण्यापासून बचावल्याचा प्रकार नुकताच घडला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचे काम सुरु आहे. रुग्णालयातील तीन वार्डमध्ये पाणी गळती आहे. त्याठिकाणी प्लास्टीक कापड लावले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालादेखील कळविले आहे. त्यांच्याकडूनदेखील पाहणी करण्यात आली आहे.
डॉ. निशीकांत पाटील
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक