। कोलाड । वार्ताहर ।
गुरुवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोलाड, हद्दीत रात्री दोनच्या सुमारास अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. कोलाड पोलिसांमार्फत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. रेस्न्यू टीमकडून बचावकार्य करण्यात आले. यादरम्यान वीजपुरवठाही खंडित झाला होता.
कुंडलिका नदीने रात्री एकच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली होती. त्याचाच फटका कोलाड परिसरातील गावांना बसला असून, गोवे, पुई, कॉलनी स्टॉप,आंबेवाडी, संभे, पाले खुर्द, डिव्हिजन कॉलनी रोड, तटकरे कॉमपेक्स, संजय गांधी नगर रोहा कोलाड रोडवर पाणी आले होते. यात अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, त्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून महसूल प्रशासन, कोलाड पोलिसांच्या मार्फत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसासह वादळ असल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. तर गोवे येथील रुपेश गोविंद गायकवाड यांचाही वाडा कोसळला आहे.







