जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात गळती;आ.जयंत पाटील आक्रमक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग जिल्हा शासकीय रूग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात गेल्या दीड महिन्यांपासून गळती होत आहे. याबाबत ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसात काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापही ठेकेदाराने कोणतेही काम केले नाही. त्यामुळे आ. जयंत पाटील यांनी आक्रमक भुमिका घेत रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संबंधित अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे.

जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग नियमित सुरू झाला नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी, त्यांना आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयाचे काम हे मुंबई येथील ठेकेदाराला देण्यात आले असून, काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन देवूनही परिस्थिती जैसे थे राहिली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

जिल्हा रूग्णालयातील परिचारिका कक्ष, स्वच्छता कक्ष आणि इतर कक्षातही गळती होत आहे. त्यामुळे नक्की ठेकेदाराने कोणते काम केले असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या झालेल्या दुरावस्थेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शस्त्रक्रिया विभाग पूर्ववत सुरू करण्यात यावा. तसेच संबंधित दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version