मुख्य प्रशासकीय इमारतीला गळती

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या केबिनमध्ये पाणी
महत्त्वाची दस्तावेज भिजण्याची भीती

| पेण | प्रतिनिधी |
आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पेण नगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्य इमारतीलाच गळती लागली आहे. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकार्‍यांच्या खोल्यांमध्ये पाणी ठिबकत असल्याने ठिकठिकाणी बादल्या लावण्याची वेळ आली असून, त्यामुळे सगळ्यांचीच गैरसोय होऊ लागली आहे. या गळतीमुळे महत्त्वाची दस्तावेज भिजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पेण नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा 28 जुलै 2010 ला करण्यात आला. तर, इमारतीचे कोनशिला भूमीपूजन 19 जुलै 2002 ला संपन्न झाले. तब्बल आठ वर्षांच्या कालावधीत नगरपालिकेची प्रशासकीय इमारत व वाणीज्य संकुलाचे काम पूर्ण झाले. आणि, मोठ्या दिमाखात या इमारतीला स्थानिक नेत्यांना डावलून शरद पवार भवन हे नामाकरण केले. या कार्यक्रमाला व प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री, अर्थ व नियोजनमंत्री, माजी ऊर्जा व तंत्रशिक्षण मंत्री अशा मान्यवारांची मांदियाळी उपस्थित होती. त्यानंतर या इमारतीत सर्व कारभार सुरू झाला. मात्र, अवघ्या आठ वर्षांतच इमारतीला गळती लागली आहे.

2010 ते 2022 म्हणजेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत. सरकार नियामनुसार प्रशासकीय इमारतीचे 15 वर्षांनंतर स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट (दर्जाची तपासणी) करणे गरजेच होते. परंतु, पेण नगरपालिकेच्या इमारतीला 12 वर्षेच उलटून गेलेत. त्यामुळे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट झाले नाही. परंतु, गेल्या आठवडाभराच्या पावसामुळे दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या नगरपालिका कार्यालयांच्या निम्मापेक्षा जास्त खोल्यांमध्ये गळती सुरु झालेली आहे. कर व शुल्क अधिकारी महेश वडके व शेखर अभंग यांच्या रुममध्ये पाणीच पाणी झालेले आहे. तसेच अस्थापनाचे भरत निंबरे यांच्यादेखील खोलीमध्ये पाणीच पाणी झाले असून, सर्वत्र बादल्या लावल्याचे चित्र आपल्याला प्रथमदर्शी दिसत आहे. दालनात पाणी येत असल्याने बसणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. तसेच कर व शुल्क विभागातील फर्निचरमधून वाहत असणार्‍या पाण्यामुळे फर्निचरदेखील पूर्ण फुगले असून, ते केव्हाही खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि, जर दुर्दैवाने अपघात झाले, तर याची जबाबदारी घेणार कोण? तसेच सततच्या गळतीमुळे दस्तावेजदेखील भिजण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे, नगरपालिका प्रशासकीय इमारत व वाणिज्य संकुलाच्या इमारतीचे लोकार्पण झाल्यापासून एकही रुपयाचा विमा उतरवला नव्हता. ही बाब 2020 च्या आर्थिक बजेटमध्ये नगरसेवक संतोष पाटील यांनी सर्वसाधारण सभेत अधोरेखित करुन त्याबाबत ठराव पास करुन घेतला. आणि त्यानंतरच या इमारतीचा विमा उतरविण्यात आलेला आहे. ज्या पेण नगरपालिकेचे आर्थिक बजेट 64 कोटींच्या घरात आहे, त्या नगरपालिकेमध्ये इमारतीच्या डागडुजीसाठी गेल्या चार वर्षांत फक्त 1 लाख 28 हजार 453 रुपये खर्च करण्यात आला आहे. याचाच अर्थ, इमारतीच्या डागडुजीमध्ये आर्थिक मलिदा नसल्याने सत्ताधार्‍यांनीदेखील त्या गोष्टीकडे कानाडोळा केला, हेच सिद्ध होते. यावरुन एवढे निश्‍चित ना प्रशासकीय अधिकार्‍यांना, ना सत्ताधार्‍यांना इमारतीची काळजी?

डागडुजीसाठी केलेला खर्च

साल खर्च रुपये

2018/19 57 हजार 400
2019/20 68 हजार 499
2020/21 25 हजार 548
2021/22 एकही रुपया नाही

पेण नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला गळती लागलेली आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण, एखाद्या इमारतीचे पंधरा वर्षांनंतर स्ट्रक्चर ऑडिट केले जाते. परंतु, ही इमारत पूर्ण होऊन 12 वर्षेच झालेली आहेत. तरीदेखील मी माझ्या अधिकाराने इमारतीचे पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट, लाईट ऑडिट, तसेच अग्नीरोधक यंत्रणेचे ऑडिट युद्धपातळीवर करुन घेणार आहे. पाऊस थांबताच इमारतीवर पत्र्याची शेड टाकून घेणार आहे. असे केले नाही तर अनेक महत्त्वाची कागदी दस्तावेज पाणी लागून वाया जाण्याची शक्यता आहे.

– जीवन पाटील, मुख्याधिकारी
Exit mobile version