रुग्णांचे आरोग्य धोक्यात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
येथील जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या शस्त्रक्रिया विभागाच्या छताला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यातून वरच्या मजल्यावरील दूषित पाणी ठिबकत आहे. हे पाणी पसरू नये यासाठी त्याखाली बादल्या लावण्याची वेळ आली आहे. या पाण्यामुळे येथील छताला बुरशी आणि शेवाळ पसरली आहे. कुबट वास येतो आहे. अशा दूषित वातावरणातच रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरच हा विभाग इथून हलवण्यात येणार असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितले.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत ही जीर्ण झाली असून ती नव्याने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. इमारतीत अनेक भागात छत पडणे, पाणी गळणे, ड्रेनेज समस्या रोज उद्भवत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शस्त्रक्रिया कक्षात बाहेरील व्यक्तीला आत सोडले जात नाही. सर्व कक्ष हा निर्जंतुक केला जातो. मात्र याच शस्त्रक्रिया कक्षात शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर, परिचारिका हात स्वच्छ करतात त्या बाजूच्या भागातील कक्षाचा छत निकृष्ट कामामुळे दूषित पाण्याने पाझरू लागला आहे. पडणारे थेंबथेंब पाणी पसरू नये म्हणून बादल्या लावल्या आहेत तरीही हे पाणी फरशीवर पसरत आहे. त्यामुळे या भागातच अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत दुरुस्ती कामासाठी जिल्हा नियोजन मधून 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र तरीही ज्या ठिकाणी रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाते त्याठिकाणच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे.
शस्त्रक्रिया कक्षात गळती सुरू आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. या कामासोबत इतर कामाची निविदा बांधकाम विभागाने काढण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. दुरुस्तीकामासाठी शस्त्रक्रिया कक्ष आम्ही खाली करून देणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.