जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध; नाव नोंदणी करण्याचे आवाहन
। रायगड । खास प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जर्मन भाषा शिकवण्यासाठी शाळेतील शिक्षकांना संधी असून, यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन पनवेल येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ.सुभाष महाजन यांनी केले आहे.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार 25 फेब्रुवारीला केला आहे. तसेच, पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी 11 जुलैला शासन निर्णय निर्गमित केला आहे.
जर्मन भाषा शिकण्यासाठी जिल्हास्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10 हजार विद्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) 200 प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता बीए इन जर्मन, एमए इन जर्मनी व ग्योथे इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय अ1, अ2, ब1, ब2, क1, क2 उत्तीर्ण अशी आहे. मात्र, अशा शैक्षणिक अहर्ता शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरू करणे प्रस्तावित असून शिक्षकांच्या नाव नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक तयार केली आहे.
राज्य शासनाची योजना
राज्यातील कुशल-अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे रोजगारासाठी अधिकृतरित्या पाठविण्यासाठीची राज्य शासनाची योजना आहे. जर्मन भाषेचे प्रशिक्षण जिल्ह्यात मोफत व जवळच देण्यात येणार आहे. आवश्यक कौशल्य सुधारण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. आरोग्य सेवामधील तंत्रज्ञ, अतिथ्य सेवामधील तंत्रज्ञ, स्थापत्य सेवांमधील तंत्रज्ञ यासह अन्य सेवांमधील तंत्रज्ञ म्हणून संधी उपलब्ध होणार आहे. 11 जुलैच्या शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणार्या राज्यातील पात्र व कुशल युवक-युवतींनी ऑनलाईन नाव नोंदणी करावी.
पहिल्या टप्प्यात हजार जणांना संधी
जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी राज्यातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथील सुरुवातीच्या काळातील मदतही राज्याची असणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार युवक-युवतींना संधी उपलब्ध होणार आहे. उत्पन्नामध्ये भरघोस वाढ व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीवर काम करण्याची संधी युवकांना मिळणार असल्याचेही म्हटले आहे.