| चिरनेर | प्रतिनिधी |
आपले पूर्वज स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात लढले आणि त्यांच्या प्रेरणेतून या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला जागा मिळाली आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नासाठी आपण लढण्याची भूमिका ठेवली पाहिजे, असे आवाहन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले. चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 95 वा हुतात्मा स्मृतीदिन चिरनेर हुतात्मा स्मृतीस्तंभाजवळ गुरुवारी (दि.25) दुपारी बारा वाजता संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योगपती पी.पी.खारपाटील, शिंदे गटाचे अतुल भगत, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानीफ मुलानी, राजिप माजी सदस्य संतोष ठाकूर, तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, विनोद म्हात्रे, महेंद्र ठाकूर सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना बाळाराम पाटील यांनी कोणत्याही पक्षाचा संदर्भ या कार्यक्रमाला न लावता या कार्यक्रमाला ज्याला यावं असे वाटत असेल त्यांनी यावे. न येणाऱ्यांचा विचार न करता येणाऱ्यांचे अभिनंदन करून, त्यांचा सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन केले. हा एक अतिशय चांगला सोहळा आहे. या सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष असताना अरुण कारेकर यांच्या शिल्पकलेतून या हुतात्म्यांची पूर्णाकृती शिल्पचित्रे तयार करून घेतली. त्यासाठी हुतात्म्यांच्या वारसदाराकडून त्यांच्या चेहऱ्यांच्या वर्णनाची माहिती मिळविली. हि भावी पिढीला प्रेरणा देणारी शिल्पचित्रे तयार करून घेतली. आज ही शिल्पे येथील पराक्रमाची साक्ष देत आहेत. हे एक अतिशय समाधानकारक काम त्यावेळी करता आले. माझी नाळ या कार्यक्रमाशी जोडली गेली आहे. श्री महागणपतीच्या आशीर्वादाने हा सोहळा दरवर्षी उत्तम रीतीने पार पडत आहे. त्यावेळी जिल्हा परिषदेकडून या कार्यक्रमासाठी निधी हा तुटपुंज स्वरूपाचा मिळत असे. पण आता या निधीमध्ये चांगली वाढ झाली आहे, असे माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले.
हा एक चांगला सोहळा असून येणारी मंडळी या सोहळ्याचा आनंद घेतात. राजकारणामुळे किंवा व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला येता येत नसेल तर तो प्रश्न बाजूला ठेवून या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले संकल्प करावेत असेही त्यांनी सांगितले. शासन स्तरावरून जनतेच्या बाबतीत अनास्था दिसून येत आहे. 1970 साली सिडको आली. 1994 साली साडेबारा टक्केचा निर्णय घेतला. पण आजपर्यंत बारा टक्के प्रकल्पग्रस्तांना सिडकोचे प्लॉट मिळालेले नाहीत. तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून एमएमआरडीए या ठिकाणी येत आहे. विरार-अलिबाग कॅरिडोरचा विस्ताराचा प्रश्न येथील जनतेचा प्रश्न आहे. या प्रश्नांची आपण दखल घेतली पाहिजे. पण त्यासाठी जमिनीवर आग लागलेली दिसली पाहिजे. तरच त्याचा धूर दिसणार आहे. त्या जिद्दीने मानसिकता तयार केली पाहिजे, असे बाळाराम पाटील म्हणाले.
सिडकोचे साडेबारा टक्के मिळविण्यासाठी पाच हुतात्म्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली. प्रत्येक हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. लढा द्यावा लागत आहे. आजही आपले प्रकल्पग्रस्त लढत आहेत. प्रत्येक गोष्टीला चालना मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तरच शासन यंत्रणा दखल घेते. पनवेल तालुक्यामध्ये भूसंपादन होत असताना चार लाख भूसंपादनाचा दर होता. परंतु पनवेलच्या शेतकऱ्यांनी काम आडविले. त्यामुळे शेतकऱ्यांना 16 लाखापासून 22 ,23, व 24 लाखापर्यंतचा भाव मिळाला. अशावेळी शेतकरी जागृत असायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शेवटी सांगितले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी मनोगत व्यक्त करताना ज्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वतंत्र्याची पहाट उगवली. त्या हुतात्म्यांची चिरनेर हि ऐतिहासिक भूमी आहे, असे सांगितले. हे श्री महागणपतीचे तीर्थस्थळ आहे. इतिहासाची परंपरा या तालुक्याला लाभली आहे. हे या भूमीचे मोठे भाग्य आहे. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळविलेले स्वातंत्र्य चिरकाल टिकवणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या भूमीसाठी चांगले काम आपल्या हातून झालेच पाहिजे. असे प्रतिपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले.
विमानतळाला नाव देण्यावरून मी जाहीरपणे सांगतो की पहिले विमान उडेल त्यावेळी दिबा पाटीलांचेच नाव त्या विमानतळाला लागलेले असेल. हा निर्णय शासकीय पातळीवर झालेला आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचे राजकीय भाष्य नाही. परंतु शासकीय पातळीवर हा निर्णय सकारात्मक झालेला आहे. त्यामुळे जे विमानाचे उड्डाण होईल ते दि.बा. पाटलांचे नाव असूनच विमान उड्डाण होईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रश्न सोडविण्यासाठी लढायला शिका: माजी आ. बाळाराम पाटील
