झुंझार युवक मंडळातर्फे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव उपांत्यपूर्व फेरीत

| पोयनाड | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एलिमिनेटरच्या सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघांनी किक-फ्लिक स्पोर्ट्स एरिना खोपोली संघावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी आपली जागा निश्‍चित केली आहे. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या माणगाव संघांनी 38.1 षटकांमध्ये सर्व गडी बाद 217 धावसंख्या उभारली, त्यामध्ये मधल्या फळीत अजय जाधव यांनी आतिशी फलंदाजी करत सर्वाधिक 69 धावा ठोकल्या त्या दुसर्‍या बाजूने पार्थ म्हस्के 21, प्रीत जैन 19 धावा काढून साथ दिली, खोपोली संघाकडून वैभवी कुळकर्णी श्रीयुष चव्हाण यांनी प्रत्येकी 3 तर निशी विठलांनी आणि गीतांजली शर्मा यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूत पाठवले. 218 धावांचा पाठलाग करतांना खोपोलीच्या संघाचा डाव सुरवातीपासूनच ढासळत गेला अवघ्या 53 धावसंख्येवर सर्व फलंदाज बाद झाले, माणगाव संघाचा कर्णधार आणि फिरकीपटू निधीश मेहता व पार्थ म्हस्के यांनी प्रत्येकी 3 तर अजय जाधव यांनी 2 गडी बाद केले. माणगाव संघाने मोठ्या फरकाने सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे, किक-फ्लिक खोपोली संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आता प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाबरोबर होणार आहे. अष्टपैलू खेळाडू अजय जाधव याला सामनावीर, वैभवी कुलकर्णी स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, निधीश मेहता व वैदिक धनांनी इमॅर्जिंग प्लेयर तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून श्रेया पडळकर, अथर्व जाधव यांना किशोर तावडे, मयुर जैन, विशाल निषाद, उमाशंकर सरकार, रोहित काळे, नितीन सिंधकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version