हिम्मत असेल तर मविआ सोडा- एकनाथ शिंदे

| मुंबई | प्रतिनिधी |

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन शिंदे गट आणि भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा डाव आखला आहे. केवळ सावरकर आमचे दैवत आहे, त्यांच्याविषयी होणारा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहूल गांधी यांना न सांगता महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची हिम्मत उद्धव ठाकरे यांनी दाखवावी,असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मालेगावच्या सभेत ठाकरे यांनी सावरकरांविषयी होत असलेल्या टीकेवरुन राहुल गांधी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे जाहीर वक्तव्यही त्यांनी केले होते. तोच मुद्दा पकडत सोमवारी भाजपसहित शिंदे गटाने ठाकरे यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर टीका केली. त्यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. एकीकडे सावरकर आमचे दैवत आहेत असे सांगतात आणि दुसरीकडे काँग्रेसमवेत आघाडी करतात हे चुकीचे आहे. त्यांनी महाविकास आघाडी सोडून द्यावी, असे आव्हानही शिंदे यांनी दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी हे वारंवार अवमान करत आहेत. त्यांची सावरकर होण्याची लायकी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी निषेध व्यक्त केला. राहुल गांधींच्या कृत्याचा आणि त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. सगळ्यांनीच त्यांचा निषेध करायला हवा होता, असे ते म्हणाले.

राहुल गांधी हेे वारंवार सांगत आहेत की, मी सावरकर नाही, मी गांधी आहे. पण सावरकर होण्याची तुमची लायकीदेखील नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही, मग तुम्ही सावरकर कसं काय होऊ शकता? सावरकर व्हायला त्याग आणि देशाबद्दल प्रेम असायला हवं.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राहुल गांधींना उद्देशून एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, तुम्ही तर परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं या देशाचं दुसरं दुर्दैव काय असू शकतं. तुम्ही देशाची लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी परदेशात जाऊन बोलत आहात. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं, हे आपण समजू शकतो. पण आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणं, याचीही निंदा करावी तेवढी कमी आहे. खर्‍या अर्थाने हा एकप्रकारे देशद्रोहच आहे. अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

Exit mobile version