| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाने गोस्वामी तुलसीदास जयंतीनिमित्त ‘जनरेशन झेड’ (Gen Z) आणि रामचरितमानसमधील ‘राम’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे उत्साहाने आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्वितीय वर्ष कला वर्गातील सृष्टी पाटील हिने राम स्तुती गायनाने केली. डॉ. देविदास बामणे यांनी रामचरितमानसातील रामाचे व्यक्तीमत्त्व आणि जीवनमूल्ये यांना सध्याच्या जनरेशन झेडच्या संदर्भाशी जोडून आपले विचार मांडले. त्यांनी आजच्या काळात सत्य, प्रतिष्ठा, कर्तव्य, त्याग, संयम, नेतृत्व आणि मानवी करुणा यांसारख्या मूल्यांच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला. बदलता काळ आणि तंत्रज्ञान असूनही मानवी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज असल्याचे विचार त्यांनी मांडले. या कार्यक्रमाची ओळख हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. अमृता शुक्ला यांनी करून दिली. त्यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या साहित्यिक योगदानावर आणि सध्याच्या संदर्भात रामचरितमानसच्या प्रासंगिकतेवर आपले विचार मांडले. हिंदी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तरुणांच्या संदर्भात गोस्वामी तुलसीदासांचे साहित्य आणि श्रीरामांची जीवनमूल्ये समजून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे आणि इतिहास विभाग प्रमुख प्रा. मिलिंद घाडगे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षल काठे यांनी केले.
पीएनपी महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
