एलईडी मासेमारी बिनबोभाट सुरूच

मत्स्य विभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष
स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीचे वेळ

| उरण | वार्ताहर |

बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपरिक मासेमारांना हात हलवत परत यावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पर्सनेट मासेमारीस बंदी असतानाही रायगड जिल्ह्यासह विशेषतः उरण व मुंबई येथे सुरू असल्याचे समुद्र किनार्‍यावर दिसते. याची माहिती शासनाच्या मत्स्य विभाग वरिष्ठ अधिकार्‍यांना असूनही कारवाई करीत नसल्याचा आरोप काही नाखवा मंडळी, मच्छिमार बांधवांकडून करण्यात येत आहे. तरी, राज्य सरकारने यावर मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

बिनबोभाट बेकायदा मासेमारीमुळे अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे तारली, दाढा, सफेद कोलंबी, नल, तेल बांगडा यांसारख्या मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत, तर भविष्यात सुमारे 40 मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भात सरकारने कडक कारवाई करून एलईडी पर्ससीननेट मासेमारी पूर्णपणे बंद केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचा निर्वाणीचा इशारा मच्छिमारांनी दिला आहे.

पर्सनेट मासेमारीस बंदी असतानाही रायगड जिल्ह्यातील विशेषतः करंजा, मोरा, रेवस समुद्र किनारी बोटींवर पर्सनेट मासेमारीस लागणारे जनरेटर, दिवे, जाळी असे साहित्यांची डागडुजी दिवसाढवळ्या होत असताना व काहीवेळा तर संबंधित वरिष्ठ अधिकारी वर्गासमोर होत असतानाही ते कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. याबाबत यापूर्वी अनेकवेळा लेखी तक्रार मत्स्यविभाग आयुक्तांकडे करूनही कोणतीच कारवाई झालेली नाही, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

Exit mobile version