‘या’ ठिकाणी सेल्फी काढाल तर तुरुंगात जावं लागेल…

सरकारचा मोठा निर्णय; पर्यटकांच्या आनंदावर विरजण
गुजरातमधील हिल स्टेशन असणार्‍या सापुतारा येथे आता सेल्फी काढणं महागात पडणार आहे. कारण हिल स्टेशन परिसरात सेल्फी काढणं हा एकप्रकारे गुन्हा असणार आहे. वारंवार होणार्‍या अपघाताच्या घटना लक्षात घेतल्यानंतर आता हा निर्णय लागू करण्यात आला आहे. दक्षिण गुजरातच्या डांग येथे असलेले सापुतारा हे पर्यटकांमध्ये एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. सापुतारा हिल स्टेशन आणि धबधबा बघायला विशेषतः पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने पुन्हा येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

डांग जिल्ह्याच्या अधिकार्‍यांनी याबाबत सूचना काढली आहे. सूचनेनुसार हिल स्टेशन परिसरात सेल्फी काढण्यावर आणि फोटोग्राफी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून डांगमध्ये असे निर्बंध लावण्यात आले असून आता नवीन अधिसूचना जारी करून त्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे, असे अधिकार्‍यांनी मंगळवारी सांगितले. अपघातात काही लोक मरण पावले आहेत आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. हे थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. सेल्फी घेताना कोणी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

सापुताराच्या टेकड्यांमध्ये पाण्याचे धबधबे आणि घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करते. याच कारणामुळे केवळ गुजरातच नाही तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमधूनही पावसाळ्यात मोठ्या संख्येने लोक येथे येतात. पावसाळ्यात बर्‍याच वेळा सेल्फी घेताना अनेकांचा अपघात झाला आहे.

त्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी टीके डामोर यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारे सेल्फीवर बंदी आणण्याविषयी माहिती देण्यात आली. भारतीय दंड सहिंता कलम 188 अन्वये सेल्फी घेणार्‍यांवर किंवा फोटोग्राफी करणार्‍यावंर कारवाई केली जाईल. तसेच, 200 रुपये दंड किंवा महिनाभर तुरूंगात जाण्याची सुद्धा शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक डांगला पोहोचत आहेत, परंतु यावेळी प्रशासनाने आगाऊ तयारी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये वाघाई-सापुतारा महामार्ग आणि वॉटर फॉल्सवर प्रशासनाने सेल्फी काढण्यास बंदी घातली होती.

Exit mobile version