अलिबागेत विधी साक्षरता शिबीर संपन्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय युवा दिन आणि राष्ट्रीय मानवी तस्करी जाणीव दिनानिमित्त अ‍ॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील लॉ कॉलेजमध्ये विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि.7) झालेल्या या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत मार्गदर्शन करताना भारतीय दंड संहिता 1860 आणि भारतीय न्याय संहिता 2023 यामधील तरतुदींचा फरक समजावून सांगितला. कायद्यातील प्रत्येक तरतूद आणि त्यात उल्लेख केलेल्या संज्ञा अत्यंत महत्वाच्या असतात. बदलती समाजव्यवस्था, बदललेले गुन्ह्यांचे स्वरूप आणि कायद्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणारे गुन्हे, गुन्हेगारांचे प्रकार, बालगुन्हेगार आणि त्याविषयीचे कायदे यामध्ये झालेले बदल याबाबतही माहिती देत कायद्यामधील घटनादुरुस्ती भविष्यामध्ये कश्या फायदेशीर ठरू शकतात याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. पियुष गडे यांनी मानवी तस्करी विषयावर निगडीत भारतीय कायद्यांची माहिती देताना युवांनी सार्वजनिक भान ठेवत, समाज माध्यमांचा वापर करुन मानवी तस्करी रोखण्यासाठी सहाय्य कसे करता येईल, याबाबत माहिती दिली. भारतामध्ये मानवी तस्करी रोखण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे आणि तरतूदींविषयी माहिती दिली. अवैध मानवी तस्करी कायदा, बालकामगार कायदा, पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायदा याविषयी मार्गदर्शन केले.

या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, सक्रेटरी गौरव पाटील, लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य अ‍ॅड. नीलम हजारे आणि आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा.डॉ.संदीप घाडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. निलम म्हात्रे, प्रा. कौशिक बोडस, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य या शिबिरासाठी उपस्थित होते. प्रा. पियुषा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लॉ कॉलेजमधील आय.क्यु.ए.सी. आणि लिगल अ‍ॅड सर्व्हिसेस समितीमार्फत प्रा. चिन्मय राणे यांनी शिबिराचे आयोजन केले होते.

Exit mobile version