न्या. अमोल शिंदेंनी केले मार्गदर्शन
| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील खानाव येथील रा.जि.प.च्या शाळेत विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी करण्यात आले होते. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अॅड. मनीषा नागावकर, अॅड. निलोफर शेख यांनी (मुलांसाठी बाल-अनुकूल कायदेशीर सेवा) योजना 2024, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 च्या विशेष संदर्भासह भारतीय राज्यघटनेच्या भाग-अंतर्गत मूलभूत कर्तव्ये, बालविवाह मुक्त भारत, शाळा सोडलेल्यांना परत शाळेच्या मोहिमेवर आणा (पीएलव्हीच्या मदतीने ड्रॉपआऊट मुलांना ओळखण्यासाठी डीएलएसएची विशिष्ट सेवा मोहीम) बालविवाहास प्रतिबंध, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा इत्यादी विषयांवर मुलांशी संवाद साधत सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
यावेळी न्या. अमोल शिंदे यांनी गुन्हा कसा घडतो?, त्याचे परिणाम काय होतात?, गुन्हा घडू नये म्हणून तसेच सावध कसे राहावे? काय दक्षता घ्यावी? याविषयी मुलांचे उद्बोधन केले. यावेळी मुलांनी शिंदे यांना प्रश्न विचारले. त्यांनी मुलांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र थळे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपश्री टोपले, केंद्रप्रमुख कीर्ती खारपाटील, शाळेचे शिक्षकवृंद व खानाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.