| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड व जिल्हा कारागृह अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जिल्हा कारागृहात बंद्यासाठी विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश रेवती एम. कंट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी रेवती एम. कंटे यांनी, मोलाचे मार्गदर्शन करताना कायदेविषयक जागरूकता वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पात्र लाभार्थ्यांनी मोफत विधी सहाय्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील प्रणालीचे सहाय्यक ॲड. पियुष गडे यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, निर्मूलन, जनजागृती, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. नालसा योजना 2025 अंतर्गत उपलब्ध सुविधांची माहिती देऊन विचाराधीन कैदी पुनरावलोकन समिती तसेच वंचित घटकांतील दोषी व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशनाचे महत्त्व स्पष्ट केले.ॲड. निलोफर शेख यांनी, प्ली बार्गेनिंग या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच, कारागृहे, पोलीस ठाणे व इतर संबंधित ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोफत विधी सहाय्य सुविधा, नालसा स्पृहा योजना 2025 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी, त्यांचे कर्मचारी व बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







