विधानपरिषद निवडणूक; मविआचा दे धक्का

नागपूर, अमरावती, औरंबादमध्ये भाजप पराभूत

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का मारत महाविकास आघाडीने पाचपैकी तीन जागा जिंकल्या आहेत. यामध्ये नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद मतदार संघांचा समावेश आहे. भाजपला केवळ कोकण मतदार संघातच यश मिळाले आहे. नागपूरमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का मानला जात आहे. नाशिकमध्ये अपक्ष सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत.

नागपूर-मविआचे अडबोले
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना 14071 तर गाणार यांना 6309 मते मिळाली. फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

कोकणमध्ये भाजपचा विजय
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे विजयी झाले. म्हात्रे यांना 20, 683 तर मविआचे बाळाराम पाटील यांना 10,997 मते मिळाली. या मतदार संघात एकूण 35069 मतदार होते. त्यापैकी 33,450 मते वैध ठरली. विजयासाठी 16,726 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला होता. 1619 मतदान अवैध ठरली. या मतदार संघात अन्य उमेदवार धनाजी पाटील – 1490, उस्मान इब्राहिम – 75, तुषार भालेराव – 90, रमेश देवरुखकर – 36, राजेश सोनवणे – 63, संतोष डामसे – 16 अशी मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काम पाहिले. त्यांना पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी यांनी सहाय्य केले.

विजयानंतर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोकण मतदारसंघातील शिक्षकांचा हा विजय झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार म्हात्रे यांनी यावेळी मानले.

बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा विचार आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार केले.

अमरावती-काँग्रेसला यश
अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार धीरज लिंगाडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन टर्म पासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. रणजित पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत. दुसर्‍या फेरी अखेर लिंगाडे हे 1600 मतांनी आघाडीवर आहेत.

औरंगाबाद-काळेंचा चौकार
शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजय मिळणार असल्याचे चित्र आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण 20 हजार 78 मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते पडली आहे. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली.

नाशिक-तांबे आघाडीवर
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना 15 हजार 784 मते मिळाली. तर, मविआ समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मिळाली. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना 7 हजार 922 मतांची आघाडी मिळाली आहे.

Exit mobile version