| मुंबई | वृत्तसंस्था ।
पालघर तालुक्यातील कुडण गावात आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. प्रेम जितेंद्र पाटील असे जखमी मुलाचे नाव आहे. दस्तुरी पाड्यात मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळताना बिबट्याने हल्ला केला होता. त्याला सिल्वासा येथील विनोबा भावे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाने कुडण परिसरात बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
प्रेम याच्या चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रथम प्रेम याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर बिबट्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी बोईसर-तारापूरजवळील कुडण, दस्तुरीपाडा, पाचमार्ग, बाराहजारी परिसरात बिबट्या दिसून आला होता. मागील महिन्यात रात्री श्री स्वामी समर्थ वाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता.
दरम्यान, हल्ल्याची माहिती वनविभागाच्या बोईसर कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला. मात्र, अद्याप बिबट्याचा वावर असल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याची माहिती वनपाल विशाल साटम यांनी दिली.