। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यात बिबट्या पाहायला मिळत असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत होत्या. यामुळे तालुक्यातील नागरीक भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहेत. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना तसेच जनजागृती केल्याचे दिसून येत नाही.
समाजसेवक धवल तवसाळकर यांच्या वेळास येथील घराच्या परिसरामध्ये बिबट्या मुक्तपणे वावरत असताना व्हिडिओ कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. घराच्या मागील परिसरामध्ये कुत्रा भुंकत होता. कुत्रा का भुकतोय नक्की काय आहे हे पाहण्याकरिता घरा मागील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण चेक केले असता हा प्रकार उघडकीस आला. बिबट्याचे गावामध्ये सुरू असलेला मुक्त संचार यामुळे लहान मुले तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून नेहमी रस्त्यांवर दिसणारी जनावर देखील बिबट्याच्या दहशतीमुळे गावामध्येच आतल्या आत फिरत आहेत.







