| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील कशेणे व इंदापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शेतकरी शेतीकामाला जाण्यास घाबरत असून, लहान मुले व महिला घराबाहेर जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या बिबट्याच्या धुमश्चक्रीला आळा घालण्यासाठी तात्काळ पिंजरा लावून त्याला पकडण्यात यावे व त्याला दूर जंगलात सोडण्यात यावे, अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
माणगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्रपाल प्रशांत शिंदे हे बाहेरगावी गेल्यामुळे कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे हे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. जर वनविभागाने या बिबट्यासाठी वेळीच खबरदारी घेतली नाही तर भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना होऊ शकते. अशा दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी वनविभागावर राहील. वनविभागाने या विषयाकडे दुर्लक्ष केले तर नजीकच्या काळात माणगाव तालुक्यात उग्र आंदोलन छेडेल जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांचे बैठक घेऊन या बैठकीत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी कोणीही घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास बाहेर पडताना काठी, बॅटरी सोबत ठेवावी. परिसरात अनोळखी हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. वनविभागाने दक्षतेचा इशारा देतानाच आपले वनपाल व वनरक्षक सतत गस्त घालत असल्याची माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत योग्य ती उपाययोजना सुरू असल्याचेही अधीक्षकांनी स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कशेणे, इंदापूरमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार
