हवामान विभागाने वर्तवला अंदाज
| मुंबई | प्रतिनिधी |
यंदाचा नैऋत्य मान्सून देशासाठी दिलासादायक ठरणार नसल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, सामान्यपेक्षा कमी पाऊस हीच सर्वाधिक शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अद्ययावत दीर्घकालीन अंदाजातून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, देशातील पावसावर अवलंबून असलेल्या ‘मान्सून कोअर झोन’मध्येही पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा भाग मुख्यतः कृषीप्रधान असून, खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पावसातील घट शेती, जलसाठे, वीजनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि उत्तर-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. ईशान्य भारतात मात्र तुलनेने सामान्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असून, काही मोजक्या भागांतच सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
एल निनोचा परिणाम
हवामान विभागाने स्पष्ट केले की, प्रशांत महासागरात एल निनो स्थिती विकसित होण्याचे संकेत मिळत आहेत. एल निनोचा परिणाम साधारणतः भारतीय मान्सूनवर प्रतिकूल मानला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सूनकडे कृषी क्षेत्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
कमी पावसाचा दुष्परिणाम
कमी पावसामुळे शेती उत्पादन घटणे, जलसाठ्यांवर ताण वाढणे, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणे आणि उष्णतेचा प्रभाव तीव्र होणे अशा विविध संकटांचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जलसंधारण, दुष्काळ नियोजन आणि उष्णतेविरोधी उपाययोजनांवर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
जून महिन्याचा अंदाज
जून महिन्याबाबतचा अंदाजही चिंताजनक आहे. जूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असून, बहुतांश राज्यांत पावसाची तूट राहू शकते. उत्तर-पश्चिम भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही भाग वगळता उर्वरित प्रदेशांत कमी पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, जूनमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, गुजरात, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागांत उष्णतेच्या लाटांचे दिवस वाढू शकतात. महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील काही भागांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
