| रसायनी | वार्ताहर |
मुलींना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळाले पाहिजे, असा सल्ला अॅड. वर्षा देशपांडे यांनी गुळसुंदे येथील तुंगारतन हायस्कूलमधील मुलींना मार्गदर्शन करताना दिला. लेक लाडकी अभियान, डॉ. मेघा देशपांडे आणि संवेदना डेव्हलपमेंट फाऊंडेशन व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंख फुटलेली मुलगी’ हा लघु चित्रपट दाखवण्यात येऊन त्याबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी उपस्थितांनी हे आवाहन केले. किशोरवयीन मुलींना स्त्री-पुरुष समानता, अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे धैर्य यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी अन्याय सहन करू नका, असे आवाहन यावेळी केले. त्यांनी आमच्या संस्थेला आतापर्यंत 100 हून अधिक बालविवाह रोखण्यात यश आले असून, रोखलेल्या बालविवाहातील मुली पुढे शिकून चांगल्या नोकरीत असल्याचे सांगितले. हा चित्रपट दाखवल्यानंतर मुलींशी संवाद साधण्यात आला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.
कार्यक्रमास डॉ. मेघा देशपांडे (मोहोपाडा), कैलास जाधव चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता (सातारा), मोहिनी बागडे (मोहोपाडा), गुळसुंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.टी. कांबळे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पनवेलच्या विस्तार अधिकारी वैशाली वैदू, आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बीट 1 व 2 च्या पर्यवेक्षिका कार्तिकी मोकाशी व वनिता वाघ, अंगणवाडी ताई/सेविका आणि गुळसुंदे सरपंच मयूर बांडे, जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, पं.स. सदस्य जगदीश पवार, विश्वनाथ गायकवाड, अरविंद पाटील, माधवी गाताडे आदींची उपस्थिती होती.