मांडवा येथील आरसीएफची जेट्टी मच्छिमारांना वापरण्यास द्या – आ.जयंत पाटील यांची मागणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मांडवा बंदरालगत असलेली आरसीएफ जेटी दुरुस्ती करून सदर जेटी मच्छीमार व्यावसायिकांना वापरण्यास दिली जावी, अशी जोरदार मागणी आ.जयंत पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे गुरुवारी विधानपरिषदेत केली. या विषयावर बोलताना ते म्हणाले की, मांडवे येथील आरसीएफ जेटी नादुरूस्त झाली असून, या ठिकाणी मच्छिमारांच्या सुमारे 80 हून अधिक बोटी असून, मासेमारी व्यवसायामुळे सुमारे एक हजार जणांना रोजगार मिळणार आहे. मच्छीमारांना मासळी उतरविण्यास परवानगी मिळण्यासाठी मागील 4 वर्षांपासून मच्छिमार बांधवांची मागणी आहे. थळ येथील खतनिर्मिती कारखान्याला माल उतरविण्यासाठी 1986 मध्ये मांडवे समुद्रकिनार्‍यालगत जेटी बांधण्यात आली असून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी माल उतरविण्याचे काम बंद आहे त्यानंतर दुर्लक्षित झाल्यामुळे सदर जेटी नादुरूस्त झाली या ठिकाणी मासळी उतरविण्याबरोबरच जाळी ठेवण्यासाठीही जागा भाडेतत्वावर देण्यात येण्याबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे मांडवे येथील मच्छीमारांनी मागणी केली मात्र याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने मच्छिमारांची मोठी गैरसोय होत आहे,असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यासाठी सबब सदर मांडवा जेटी लवकरात लवकर दुरूस्त करून मच्छिमारांना मत्स्यव्यवसायासाठी वापरण्यास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version