पनवेलच्या पत्रकारांचा निर्धार
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यात झालेल्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत झालेले चुकीचे गैरसमज, यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात पनवेल तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थित दाखवून तालुक्यातील 50 हून अधिक पत्रकार हे एका छताखाली जमले आणि एक तालुका एकसंघ करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला.
चर्चासत्राच्या सुरुवातीलाच दिवंगत पत्रकार किरण बाथम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर मुंबई येथे पोलीस खात्याकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, निलेश सोनावणे, संजय कदम, सय्यद अकबर, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्वानुमते असे ठरले की, पुढील काही महिने सर्वांनी आपापल्या संघटना बाजूला ठेवून एकत्रित पणे काम करू. याचबरोबर पनवेलबाहेरील पत्रकार पनवेलमध्ये येऊन राजकीय पुढारी आणि शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅक मेलिंग करून जी अनधिकृत वसुली करीत त्यांना आवर घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठरवले आहे. याचवेळी ज्येष्ठ आणि नवोदित पत्रकारांची कोअर कमिटी बनवण्यात आली. या कमिटीमध्ये कोणीही अध्यक्ष किंवा सचिव नसणार आहे.
यावेळी लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आज सुरु असलेल्या पत्रकारितेबाबत पत्रकारांनी चर्चा केली तसेच लवकरच पनवेलचे पत्रकार एका छताखाली यावेत यासाठी एक नवीन नोंदणीकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
